आगळा वेगळा विक्रम ः महालक्ष्मी डेव्हलपर्सचे दत्तात्रय गोते पाटील यांचा पुढाकार
वाघोली – शिवकथाकार श्री विजयराव देशमुख लिखित आणि छत्रपती सेवा प्रतिष्ठान प्रकाशित शककर्ते शिवराय ग्रंथाने आज हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. पुण्यातील वाघोलीस्थित बांधकाम व्यवसायिक महालक्ष्मी डेव्हलपर्सचे दत्तात्रय गोते पाटील यांच्या पुढाकाराने ही हेलिकॉप्टर राईड आयोजित केली होती. महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या काही भाग्यवान ग्राहकांनीही शककर्ते शिवराय ग्रंथासह हेलिकॉप्टर मधून राईडचा आनंद लुटला.
शककर्ते शिवरायच्या प्रथमावृत्तीचे प्रकाशन रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300व्या समाधीदिनी म्हणजे 1980मध्ये झाले. त्यावेळी या शिवचरित्राची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर विदर्भातील अकोला येथे शेगाव संस्थानच्या हत्तीवरूनही या ग्रंथाची मिरवणूक काढली होती, अशी माहिती प्रतिष्ठानचे निखिल सुरांगळीकर यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
आता शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षात प्रतिष्ठानने काढलेल्या विशेष शिवावृत्तीचे हेलिकॉप्टरमधून उड्डाण झाले आहे. अशा प्रकारे विविध वेळी विविध ठिकाणी चांदीच्या पालखीतून, हत्तीवरून आणि हेलिकॉप्टर मधून मिरवणूक काढण्यात आलेला शककर्ते शिवराय हा मराठी साहित्य विश्वातील कदाचित एकमेव ग्रंथ असेल. सध्या पुण्यात राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे ग्रंथ प्रदर्शन सुरू असून रोज नवनवीन विक्रम होत आहेत. त्यात शककर्ते शिवराय च्या याही आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद साहित्य विश्वाला नक्कीच घ्यावी लागेल.
हे वर्ष प्रतिष्ठान हर घर शिवचरित्र अभियान राबवत असून त्या अंतर्गत एक लक्ष घरी शककर्ते शिवराय शिवचरित्र पोहोचवण्याचा संकल्प आहे. 1200 पानांचे हे द्विखंडात्मक शिवचरित्र प्रतिष्ठान ने फक्त 500 रुपयांत उपलब्ध केले असून नाममात्र टपाल खर्च आकारून ऑस्ट्रेलिया, जपानपासून ते अमेरिका कॅनडापर्यंत या विशेष शिव आवृत्तीच्या 10 हजार प्रती शिवभक्तांना वितरित केल्या आहेत.
आज झालेल्या हेलिकॉप्टर उड्डाणाने एक लक्ष प्रतींच्या संकल्प पूर्तीसाठी महालक्ष्मी डेव्हलपर्स सर्व प्रकारे सहकार्य करेल, असे आश्वासन गोते पाटील बंधूंनी दिले. याप्रसंगी महालक्ष्मी डेव्हलपर्सचे दशरथ गोते पाटील, संदीप गोते पाटील, रजनीश द्विवेदी, तसेच प्रतिष्ठान तर्फे रोहित पांडे, मंगेश बरबडे, अभिजीत अगस्ती, शशांक देशपांडे आणि महालक्ष्मी डेव्हलपर्सचे सुमारे 50 पेक्षा जास्त भाग्यवान ग्राहक हेलिकॉप्टर राइडमध्ये सहभागी झाले होते.