प्रभात वृत्तसेवा
पुणे ( pune district corona updates ) – जिल्ह्यात महिनाभरापूर्वी वाढलेली सक्रिय बाधित संख्या हळूहळू कमी होत लागली आहे. दि.7 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील सक्रिय बाधित संख्या 10 हजार 122 इतकी होती. तर आज ही 7 हजार 992 पर्यंत खाली आली आहे. नव्या बाधित संख्येपेक्षा करोनामुक्तीचे प्रमाण अधिक असल्यामुळे सक्रिय बाधित संख्येतही घट झाल्याचे दिसून येते.
फेब्रुवारी 2021 पासून करोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यावेळी जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या 3 लाख 72 हजार 237 इतकी होती. तर मागील पाच महिन्यांत दुप्पटीने म्हणजे 6 लाख 88 हजार बाधित वाढले आहेत.
करोनाची दुसरी लाटेने पुणे जिल्ह्यासह राज्यात थैमान घातले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोना संसर्ग कमी होऊ लागला. त्यामुळे सक्रिय बाधितांमध्ये हळूहळू घट होऊ लागली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय बाधित संख्या 3 हजार 908 इतकी होती.
जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधित
दिनांक – सक्रिय बाधित
14 एप्रिल – 97 हजार 23
5 मे – 96 हजार 516
19 मे – 64 हजार 914
2 जून – 23 हजार 514
23 जून – 8 हजार 493
7 जुलै – 10 हजार 122
21 जुलै – 9 हजार 308
18 ऑगस्ट – 7 हजार 992
करोनाचे 197 बाधित, आणखी 12 मृत्यू
पुणे – शहरात गेल्या चोवीस तासांत 197 करोना बाधित आढळले असून, बरे झालेल्या 222 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील सहा जणांसह 12 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरात सद्यस्थितीत 2 हजार 77 सक्रिय बाधित असून त्यातील 209 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत. याशिवाय 248 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आले आहेत. आजपर्यंत 4 लाख 91 हजार 862 जणांपैकी 4 लाख 80 हजार 900 बरे झाले आहेत.
दरम्यान गेल्या चोवीस तासांत 7 हजार 619 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली.