राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत रंगणार
पुणे – पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज दूध डेअरी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. जिल्हा बॅंकेपाठोपाठ जिल्हा दूध संघावर वर्चस्व ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताकद लावाली लागणार आहे. दरम्यान, जिल्हा बॅंकेत चंचुप्रवेश केल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतही भाजप ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून (दि.14) उमेदवारी अर्ज भरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
ही निवडणूक 2020 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र राज्य शासनाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत सहकार विभागातले अधिकारी व्यस्त असल्याचे कारण देत बॅंकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. यानंतर मार्चमध्ये आलेले करोनाचे संकट यामुळे या निवडणुका आणखी लांबणीवर गेल्या.
आता या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जिल्हा दूध संघासाठी 16 संचालक पदासाठी निवडणुक होत आहे. यामध्ये एकूण मतदार 709 आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
* उमेदवारी अर्ज दाखल- दि. 14 ते दि. 18 फेब्रुवारी
* उमेदवारी अर्जांची छाननी – दि. 21 फेब्रुवारी
* पात्र उमेदवार अर्ज प्रसिद्ध – दि. 22 फेब्रुवारी
* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – दि. 22 फेब्रुवारी ते दि. 8 मार्च
* अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध व चिन्ह वाटप- दि.9 मार्च
* मतदान – दि. 20 मार्च
* मतमोजणी – दि. 21 मार्च