परिंचे – श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) ग्रामपंचायत निवडणुकीत मंजुषा संतोष धुमाळ यांचा सरपंचपदासाठी प्रचंड मतांनी विजय झाला असून पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते मंजुषा धुमाळ यांचा सत्कार करून विजय साजरा करण्यात आला. 15 पैकी 9 जागांवर कॉंग्रेसने विजय मिळवला असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ यांनी सांगितले.
या निवडणुकीत कॉंग्रेसने 9, भाजप 5 व राष्ट्रवादी शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांच्या मंजुषा धुमाळ पत्नी असून गेल्या तीन वर्षांपासून देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करत असलेल्या समाज उपयोगी उपक्रमाची पावती मिळाली असल्याचे सांगून गावातील सर्व समाजाच्या मतदानातून सरपंच पदाचा आशिर्वाद दिला असल्याचे संतोष धुमाळ यांनी सांगितले आहे.
सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीच्या सुरुवातीला मंजुषा संतोष धुमाळ व हर्षला ऋषिकेश धसाडे यांच्यामध्ये सरपंचपदासाठी चुरस पहायला मिळाली पण यामध्ये मंजुषा धुमाळ यांनी 350 मतांनी विजय मिळवत कॉंग्रेसचा बालेकिल्ला राखला आहे.
दक्षिण पुरंदर मध्ये वीर ग्रामपंचायत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात असून या ग्रामपंचायती सदस्य संख्या 15 आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसने माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पॅनल उभा केला होता. भाजपने माजी सरपंच मधुकर धसाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल उभा केला होता. राष्ट्रवादी व शिवसेनेने युती करून निवडणूक लढविली होती.
ग्रामपंचायत सदस्य
जयश्री संमगिर, पुनम धुमाळ, अनिकेत समगिर, मोहन चवरे, जयश्री धुमाळ, युवराज धुमाळ, गणेश तांदळे, छाया धसाडे, आशा जाधव, पूजा बुरुंगुले, दिपाली वाघ, एकनाथ वचकल, प्रतीक सोनवणे, जयश्री धुमाळ, राहुल खोमणे.