मंचर – गवारीमळा येथे तारेच्या सापळ्यात अडकलेल्या बिबटच्या दोन बछड्यांची वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी सुखरूप सुटका केली.
गवारीमळा मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी सोपान दत्तू गवारी यांच्या उसाच्या शेताशेजारी अज्ञाताने लावलेल्या तारेच्या सापळ्यात मध्यम वयाचे बिबट्याचे दोन बछडे अडकले होते. यात एका बछड्याचे दोन पाय व एका बछड्याचा एक पाय अडकला होता. शेतकरी सोपान गवरी यांनी याबाबत वन खात्याला माहिती दिली.
घटनेची माहिती कळताच वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक बी. एच पोत्रे, सी. एस शिवचरण, ऋषी कोकणे, वनमजूर दशरथ मेंगडे, संपत भोर, शरद जाधव, अरुण खडागळे, रेस्कू टीम सदस्य जयेश शहा, अतुल साबळे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली.
घटनास्थळी नागरिक जमा झाले होते, त्यामुळे बछडे गुरगुरत होते. घटनास्थळी आलेल्या वनाधिकारी व कर्मचार्यांनी तात्काळ पिंजरा बोलवून बछड्यांची तारेतून सुटका करत त्यांना उपचारासाठी ताब्यात घेतले आहे.