तळेगाव दाभाडे – सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणे मुंबई तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातुन लाखोच्या संख्येने हौशी पर्यटक मावळात आले होते. यामुळे यावर्षी कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांची चागंलीच कमाई झाली.
सलग लागून आलेल्या सुट्ट्यामुळे तालुक्यातील गडकिल्ले, लेण्या, धार्मिक स्थळे, तसेच पर्यटन केंद्र व थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळा खंडाळा, धरण परिसर याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. यावर्षी मात्र पर्यटकांच्या प्रचंड गर्दीने सर्व ठिकाणे गर्दीने फुलून गेली होती.
यावर्षी लोखो पर्यटक आणि त्यांची हजारोंच्या संख्येने असलेली वाहने, यामुळे स्थानिक नागरिक, रहिवासी, शेतकरी, कामकरी दुधवाल्याचे मात्र हाल झाले. मात्र, हाॅटेले, रिसाॅटॅ, धाबे, टपर्या, दुकाने, फेरीवाले, या सर्वांचीच चांगली कमाई झाल्यामुळे त्यांनी अच्छेदिन आले.
मात्र, लाखोंनी पर्यटक आल्याने पुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती महामार्ग, तसेच तालुक्यातील अंतर्गत रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आला होता. ठिकठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेट, लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पोलिसांना प्रचंड ताण आला होता. तर काही हेकेखोर पर्यटकांमुळे पोलीस आणि पर्यटक यांचे शाब्दिक खटके उडले. शुक्रवार, शनिवार व रविवारी आलेले पर्यटक सोमवारपासून आपल्या घराकडे परतू लागल्याने सोमवारी सायंकाळी पर्यटकांची गर्दी ओसरू लागली.