आप्पासाहेब जगदाळे यांच्या साथीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढली
नीलकंठ मोहिते
इंदापूर – राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणूक काळातील विरोधक, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्याशी राजकीय एकोपा करत, तर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व शहा परिवाराशी ऋणानुबंध वाढवत तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचारांचे निमगाव केतकी, कुरवली, जंक्शन परिसरातील मातब्बर नेते यांना बाजार समितीच्या निवडणुकीत थेट मदत करत, अनोखी राजकीय वज्रमूठ बांधली आहे. त्यामुळे आगामी राजकीय गणिते राष्ट्रवादी कॉंग्रेसला पोषक ठरण्याचा अंदाज येत आहे.
मागील दोन विधानसभा निवडणुकीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना अपयश आले असले तरीदेखील, सहकार क्षेत्रावर दबदबा हर्षवर्धन पाटील यांनी मजबूत ठेवला होता. त्यातच जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी विधानसभा निवडणूक कालावधीत, हर्षवर्धन पाटील यांना दिलेली साथ सन 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने, भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लाभदायक होते. हेच गणित राष्ट्रवादी कॉंग्रेसने वरिष्ठ स्तरावरून ओळखून, बाजार समितीच्या निवडणुकीत अप्पासाहेब जगदाळे यांना साथ देत राजकीय जवळीक आगामी काळासाठी साधली आहे.
तसे पाहिले तर आमदार दत्तात्रय भरणे यांना गेल्या दहा वर्षांपासून, सहजगत्या राजकीय वातावरण आपल्या बाजूने निर्माण करण्यासाठी, पोषक वातावरण त्या – त्या कालावधीत होत असते. याच संधीचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने उचलत, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या विचाराच्या पॅनलच्या उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करत, राजकीय ऋणानुबंध जुळवले आहेत. इंदापूर शहरात नगरपालिकेवर चांगले काम करून, आपल्या कामाचा ठसा देशपातळीवर उमटवणाऱ्या शहा परिवाराने, अखंड साठ वर्षांपासून, कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या विचारधारेला मानत, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना मोठी राजकीय साथ दिली होती. आपल्या शैक्षणिक संस्थेवर आपल्याच परिवाराला दुजापणाची वागणूक मिळत असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्यापासून राजकीय दुरावा घेतला आहे.
“जिथे शहा परिवार तेथे विश्वास’ हे सूत्र जनतेला माहिती असल्याने, बाजार समिती निवडणुकीत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी जगदाळे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने उभ्या केलेल्या पॅनलला मनोमन साथ दिली. तर खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे यांनी शहा परिवाराच्या घरी जाऊन कै. गोकुळशेठ भाई शहा यांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे आमदार भरणे यांची व शहा परिवाराची राजकीय एकजूट झाल्याचे चित्र शहरात व तालुक्यात निर्माण झाले आहे.
परंपरागत विरोधक म्हणून कुरवली येथील बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने, इंदापूर साखर कारखान्याचे संचालक मोहोळकर, तसेच इंदापूर अर्बन बॅंकेचे चेअरमन देवराज जाधव यांच्यासह अनेक उमेदवार बाजार समिती निवडणुकीत उभे होते. यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनोमान साथ देत, विक्रमी मताने विजयापर्यंत पोहोचवले. यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी मोठी मेहनत घेतली असल्याने, पुन्हा एकदा आपली राजकीय वज्रमूठ इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रय भरणे यांनी भक्कम केलेली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी पूर्ण
इंदापूर नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व काही ग्रामपंचायती निवडणूक संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात आगामी निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने परिपूर्ण केले आहे. यातच भर म्हणून नवे दमदार सहकारी, राजकारणात, हाती आल्याने सद्यस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस टॉपवर पोहोचलेली आहे.