कोरेगाव भीमात आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान
कोरेगाव भीमा – सध्या मोठया प्रमाणावर ऑनलाइन पद्धतीने जी आर्थिक फसवणूक होते त्याला आळा बसण्यासाठी नागरिकांनी देखील जागरूक राहिले पाहिजे. अनोळखी कॉल आला तर कुठल्याही प्रकारची माहिती ओटीपी दिला नाही पाहिजे.
सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणार्या योजनांचा शेतकरी सभासद बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेच्या कोरेगाव भीमाचे शाखाधिकारी अवधूत गव्हाणे यांनी केले.
कोरेगाव भीमा ग्रामपंचायत सभागृहात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोरेगाव भीमा शाखा, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व विविध विकास कार्यकारी सहकारी संस्था नंबर 2 कोरेगाव भीमा यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक, डिजिटल साक्षरता अभियान व हळदी कुंकू समारंभ पार पडला, त्यावेळी गव्हाणे बोलत होते.
यावेळी अध्यक्ष नागेश गव्हाणे, माजी अध्यक्ष रमेश गव्हाणे, विकास अधिकारी शहनाज तांबोळी, पोलीस पाटील मालन गव्हाणे, सचिव सुभाष सातकर यांसह सोसायटी सभासद उपस्थित होते. उपस्थितीत सभासदांना माहिती देत महिलांना हळदी कुंकू लावुन तीळगुळ वाटण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीचे सचिव मधुकर कंद यांनी केले.
या योजनांची दिली माहिती
केंद्र सरकारच्या 20 रुपयांमध्ये जीवन ज्योती विमा योजना 18 ते 55 वयोगटासाठी, जीवन सुरक्षा विमा योजना 18 ते 70 वयोगटासाठी, सोने तारण कर्ज योजना, तात्काळ कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना आदि योजनांची माहिती जिल्हा बँकेच्या तालुका समन्वयक संतीता शेवाळे, विजया मुंडे यांनी दिली.