पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील मंदिरांची स्वच्छता महापालिकेच्या वतीने केली जाणार आहे. त्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून डहाणूकर कॉलनी प्रभू श्रीराम मंदिर स्वच्छ करणे आले. यावेळी स्वच्छतेचे ब्रॅन्ड अँबेसिडर व ज्येष्ठ गायक डॉ. सलील कुलकर्णी आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ.केतकी घाटगे यांच्या उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण मोहीम २०२४ अंतर्गत पुणे महापालिकेच्या वतीने सूक्ष्म स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयात ही मोहीम राबविण्यात येत असून त्यात आता मंदिर स्वच्छताही केली जात आहे. या शिवाय, या निमित्ताने वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अधिकारी / कर्मचारी (आरोग्य विभाग) नवचैतन्य हास्य क्लब, कमिन्स इंडिया लिमिटेड, जनवानी, स्वच्छ संस्था, हर्षदीप फाउंडेशन, सेवासयोग,नागरिक यांच्यासोबत मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
माजी आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष देशपांडे यांच्या हस्ते मंदिरातील आतील परिसराची जेटिंग मशिनच्या सहाय्याने पाण्याच्या फवाऱ्याने साफ करण्यात आले. शिवाय पूजा पार्क व प्रभागातील गणपती, म्हसोबा, मारुती, भवानी माता, दुर्गामाता, महादेव, विठ्ठल या विविध देवतांचे मंदिर, तसेच बाहेरील परिसराचीही स्वच्छता करण्यात आली, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली.