भूस्खलनाचा धोका कायम : तात्पुरत्या स्थलांतरासाठी प्रस्ताव
राजगुरूनगर – पदरवाडी (भीमाशंकर, ता. खेड) येथील 300 फूट जमिनीची भेग पाऊस थांबूनही चार ते पाच फुटाने भेग वाढल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. दुसरीकडे महसूल प्रशासनाने वेळ न दवडता तातडीने भीमाशंकर येथे ग्रामस्थांची दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली.
तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी भीमाशंकर येथे दोन धर्मशाळाची पाहणी करुन तेथे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करणार आहेत. तर पदरवाडीमधील सर्वांचे कायमस्वरूपी पुर्नवसनासाठी सरकारी गायरान जागा उपलब्ध करण्याबाबत तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे तहसीलदार बेडसे यांनी सांगितले.
भीमाशंकर येथे भीमाशंकर देवस्थान कार्यालयात मंगळवारी (दि. 12) पदरवाडी ग्रामस्थांसह चर्चा केली मात्र ग्रामस्थांकडून परिस्थतीची माहिती घेत त्यांनी थेट पदरवाडी पायी चार पाच किलोमीटर डोंगरकडा उतरून घटनास्थळाची पाहणी केली. तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह, अप्पर तहसीलदार डॉ. नेहा शिंदे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, मंडलाधिकारी शारदा बढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, तलाठी शिवाजी तेलंगे,
दीपक पायगुडे, कोतवाल नितीन कदम, अरुण तिटकारे, संदीप भालेराव, संदेश सूर्यवंशी आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांसह भूस्खलन होणाऱ्या भागाची पाहणी केली. दरम्यान, पदरवाडीत प्रांत अधीकारी जोगेंद्र कट्यारे यांच्यासह ग्रामस्थानी संभाव्य धोक्याबाबत व पुर्नवसनाबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. पदरवाडी वस्तीमधील घरांच्या मागील जमीन रोज खाली सरकत आहे जमिनीला पडलेली भेग वाढली असून अतिवृष्टी झाल्यास वाढीला धोका आहे, तात्काळ स्थलांतर व कायम स्वरूपी पुनर्वसन करण्याची यावेळी ग्रामस्थानी मागणी केली.
घटनाक्रम तथा ठळक बाबी
* दि. 27 जुलै पदरवाडी वस्तीच्या मागे 300 मीटर लांब सुमारे एक फूट खोल जमिनीला भेग पडली.
*दि. 2 ऑगस्ट अप्पर तहसीलदार डॉ. नेहा शिंदे यांची पदरवाडीला भेट, पाहणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे
*दि. 8 ऑगस्ट गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश शेळके यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक *आदींसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
*दि.1 ते 4 सप्टेंबर रोजी 300 मीटर भेगेची सुमारे पाच फुटांनी खोली वाढली
* दि.5 सप्टेंबर प्रांत अधिकारी तहसीलदार यांची भेट घेतून चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांना स्थलांतर व कायमस्वरूपी पुनर्वसन याबाबत निवेदन सादर
* दि. 11 सप्टेंबर भीमाशंकर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदरवाडीला भूस्खलन धोका असल्याचे निवेदन सादर. मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला कारवाईचे आदेश
* दि. 12 सप्टेंबर भीमाशंकर येथे खेड प्रांत तहसीलदार व ग्रामस्थ यांच्यात भीमाशंकर येथे चर्चा
* दि. 12 सप्टेंबर प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांची पदरवाडी घटनास्थळाला भेट