विरोधी पक्षनेते अजित पवार : बारामती गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन
बारामती : विकासकामे होत असताना शहरातील सांस्कृतिक विकासदेखील महत्त्वाचा आहे. नटराज नाट्य कला मंडळाने बांधलेली कलादालन ही इमारत शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या कलादानाचे तसेच बारामती गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नटराजचे अध्यक्ष किरण गुजर, अभिनेते भरत जाधव, माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, संध्या बोबडे, प्रशांत काटे, बाळासाहेब तावरे, पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मुख्याधिकारी महेश रोकडे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऍड. ए. व्ही. प्रभुणे, आबा परकाळे यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, नटराज नाट्यकला मंडळाचे काम अव्वल असून यामध्ये किरण गुजर व त्यांच्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. बारामतीमध्ये वसंतराव पवार नाट्यगृहाचे नूतनीकरण केले जात असून त्याठिकाणी भव्य वास्तू उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नटराज सांस्कृतिक वारसा जपेल
करण गुजर म्हणाले की, 2003 मध्ये अजित दादांच्या संकल्पनेतून बारामती फेस्टिव्हलची सुरूवात करण्यात आली आहे. नीरा डावा कालवा सुशोभीकरणावेळी नराज चे कार्यालय पाडण्याचा निर्णय मी घेतला होता, मात्र दादांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणीच नटराज चे कलादालन उभारण्याचा निर्णय घेतला, यासाठी नगरपालिकेने सहकार्य केले. बारामतीमध्ये सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम नटराज नेहमी करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले.