पुणे – पुणे ग्रामीण अधीक्षक पदाची सूत्र अभिनव देशमुख व पुणे पोलीस आयुक्त पदाची सूत्र अभिताभ गुप्ता यांनी रविवारी (दि. 20)स्वीकारली. विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा रविवारी पुणे दौरा होता. या पार्श्वभूमीवर दोघांनीही आपला पदभार स्वीकारला.
गृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. डॉ. वेंकटेशम यांची बदली अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) या पदावर करण्यात आली आहे. याबरोबरच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांच्या काळात अधीक्षक असताना, “माझ्या हद्दीत जर कोणी काहीही आगाऊपणा केला, तर त्याचं तंगडे मोडले शिवाय राहणार नाही,’ असे जाहीरपणे अवैध धंदेवाले व त्यांच्या बगलबच्च्यांना ठणकावले होते.
त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात विविध अवैध धंद्यांना लगाम घातला. कोल्हापूर आणि गडचिरोली पोलीस अधीक्षकपदावर त्यांनी केलेल्या कामाची गृहमंत्रालयाने दखल घेतली होती. त्यांना नुकतेच आंतरिक सेवा सुरक्षा पदक देखील प्रदान केले आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ, अशी ओळख असलेल्या देशमुख यांच्या कामाचा दरारा हा पोलीस कर्मचाऱ्यांपासून सर्वच स्तरातील नागरिकांमध्ये आहे.