पुणे – पावसाने शहरात रविवारी मुसळधार हजेरी लावली. शहरात दिवसभार ढगाळ वातावरण आणि गार वारा अनुभवायला मिळाला. शहरातील काही भागांमध्ये संध्याकाळी उशिरा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. दरम्यान, पुढील दोन दिवस पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सध्या आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीवर चक्रिय स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, राज्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार तर दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे. रविवारी पुण्यात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाची तर धरणक्षेत्र आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची नोंद हवामान विभागातर्फे घेण्यात आली आहे.
दरम्यान, पुढील चोवीस तासांसाठी पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे दिला आहे. तर राज्यातही अनेक ठिकाणी विशेषत: विदर्भात जोरदार पावसाची शक्यता विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.