प्रथम सत्र विद्यार्थ्यांमधील संभ्रम विद्यापीठाकडून दूर
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा दुसऱ्या सत्राच्या परीक्षांसह घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता महाविद्यालये सुरू झाल्यावर प्रात्यक्षिक आणि मौखिक परीक्षा होणार असल्याचे दिसून येत आहे.
करोनामुळे अद्याप महाविद्यालये सुरू होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे अभियांत्रिकी, वास्तुकला, विज्ञान अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा कशा होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे प्रथम सत्राच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा द्वितीय सत्राच्या परीक्षांबरोबर घेण्याचे निर्देश दिले आहेत. नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरताना ऑनलाइन अर्जाच्या प्रक्रियेत काहीही बदल न करता लेखी परीक्षांसह प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांची माहिती प्रचलित पद्धतीनुसार भरावी.
तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी नियमित विद्यार्थ्यांचे प्रथम सत्रातील विद्यापीठ परीक्षांचे निकाल केवळ ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येतील. तसेच प्रथम आणि द्वितीय सत्राच्या मूळ गुणपत्रिका एकत्रितरित्या द्वितीय सत्राच्या गुणपत्रिकांसह स्वतंत्रपणे एकाच महाविद्यालयात पाठवण्यात येतील.
विषय राहिलेल्या (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा नेहमीप्रमाणे घेऊन त्यांचे निकाल प्रथम सत्राच्या लेखी परीक्षेनंतर जाहीर करण्यात येणार आहेत.