कात्रज – स्वारगेट-सातारा रस्त्यावर कात्रज येथील स्व राजीव गांधी प्राणिसंग्रहालय चौकातील डांबरी रस्ता खोदून या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण दीड दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र, रस्त्याचे काम अद्यप अपूर्ण आहे. काम जेथे अपूर्ण राहिले आहे त्याठिकाणी बॅरिकेड्स उभे करून काम अपूर्ण ठेवण्यात आल्याने तसेच रस्ता बॅरिकेड्सने झाकण्यात आल्याने वाहनचालकांची फसगत होऊन अपघात होत आहे.
मार्च महिना अखेर बिले काढण्यासाठी रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या लगबगीत कामंअपूर्ण ठेवली जात आहेत. पथ विभागामार्फत रस्त्याचे काम अजून अर्धवट अवस्थेत आढळून आले. रस्त्याच्या दुभाजकाजवळ मध्यभागी भेग राहिली असल्याने त्या ठिकाणी वाहन अडकून अपघात होत आहेत, त्याठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत ते देखील रस्त्यावर पडल्याने अपघाताचा धोका आहे.
स्वारगेट-सातारा मुख्य रस्त्यावरून कात्रज प्राणी संग्रहालय चौकातून त्रिमूर्ती चौक, दत्तनगर चौकाकडे जाण्याकरीता कात्रज डेअरी समोरील रस्त्याचा वापर अनेक नागरिक व वाहन चालक करतात. कात्रज डेअरी समोरील उतार देखील तीव्र असल्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर अपूर्ण काम पूर्ण करावे तसेच तीव्र उतार कमी करून रस्ता पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
कात्रज चौकातील कॉंक्रीट रस्त्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून किरकोळ काम राहिलेले आहे. पावसामुळे कॉंक्रिटीकरण मिस्करचे काही प्लांट बंद होते ते सुरू झाल्याने येथे आठवडाभरात रस्त्याचे काम पूर्ण होईल.
– अतुल कडू, कनिष्ठ अभियंता पथ विभाग