पुणे – उरुळी कांचन येथे भरदिवसा गोळीबार करून वाळू व्यावसायिक कुख्यात, गुंड संतोष जगताप याचा खून करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. इंदापूर येथून शनिवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उरुळी कांचनमधील हॉटेल सोनईसमोर शुक्रवारी (दि.२२) दुपारी तीनच्या सुमारास जगताप याच्यावर चार जणांनी गोळ्या झाडल्या. यात जगताप याचा मृत्यू झाला. तर, जगताप याच्याकडून झालेल्या क्रॉस फायरींगमध्ये हल्लेखोरांमधील स्वागत खैरे हा देखील मरण पावला.
याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. खैरे याच्यासोबत असलेले तिघे फरार होते. त्यांच्या मागावर पोलिसांनी पथके रवाना केली होती. दरम्यान, शनिवारी यातील दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.