पुणे – शहरात लुटमार करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी तिघांना धमकावून लुटल्याची घटना उघडकीस आली. नगर रस्ता, मार्केटयार्ड, घोरपडी परिसरात या घटना घडल्या.
मार्केटयार्ड भागात रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या एका प्रवाशाला दुचाकीस्वार चोरट्यांनी धमकावून लुटल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याबाबत एकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कोंढवा भागात राहायला आहेत. मध्यरात्री ते घरी निघाले होते. मार्केटयार्ड परिसरात ते रिक्षाची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांना धमकावले आणि त्यांच्याकडील बाराशे रुपये आणि मोबाइल संच असा ११ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. कदम तपास करत आहेत.
नगर रस्त्यावर फुलगाव परिसरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला धमकावून चोरट्यांनी पाच हजार ७०० रुपयांची रोकड आणि मोबाइल संच असा २० हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. याबाबत एका दुचाकीस्वाराने लोणीकंद पोलीस ठाणअयात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार आणि सहप्रवासी सायंकाळी सहाच्या सुमारास फुलगाव परिसरातून निघाले होते. त्या वेळी चोरट्यांनी दुचाकीस्वाराला अडवले. त्यांना धमकावून रोकड आणि मोबाइल संच असा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक किरण वराळ तपास करत आहेत.
दुचाकीस्वार युवतीकडील १७ हजारांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घोरपडीतील आर्मी पब्लिक स्कुलसमोर घडली. याबाबत युवतीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार युवती सकाळी अकराच्या सुमारास घोरपडी गावातून निघाली होती. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तिच्याकडील रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. पोलीस उपनिरीक्षक एच. एस. केंजळे तपास करत आहेत.
दरम्यान, सहकारनगर भाागात पादचारी ज्येष्ठ महिलेचे ७५ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सहकारनगर भाग दोन परिसरातून निघाल्या होत्या. त्यांच्या बरोबर पती आणि दीर होते. वरदान बिल्डींगसमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. निकाळजे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून पादचारी महिलांकडील दागिने आणि मोबाइल संच हिसकावण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.