पुणे – सोने खरेदीचा बहाणा करून सराफी दुकानात गेलेल्या एकाने सोन्याची चैन घेऊन दुकानातून पळ काढला. शुक्रवारी सकाळी धनकवडी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ललित गांधी (४३, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली. यानूसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी यांच्या सराफी पेढीत शुक्रवारी सकाळी एक व्यक्ती सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आला. त्याने सोन्याची चैन पाहण्यासाठी हातात घेतली. त्यानंतर काही क्षणातच त्याने चैनसह दुकाना बाहेर पळ काढला.
यावेळी त्याचा साथीदार असलेला एक दुचाकीस्वार त्याची बाहेर वाट पाहत थांबला होता. साथीदारासोबत कात्रजच्या दिशेने दोघेही फरार झाले. गांधी यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधिर घाडगे करीत आहेत.