पुणे – सराफाच्या दुकानातील पाच किलो सोने आणि अकरा लाखाची रोकड चोरणाऱ्यास साथीदारांसह फरासखाना पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकांनी अटक केली. त्यांनी चोरलेला मुद्देमाल विहीर, शेतात आणि गवतात लपवून ठेवला होता. हा मुद्देमाल शोधण्यासाठी बीडीडीस, श्वान आणि डी.एस.एम.डी पथकाचा वापर करण्यात आला. मेटल डिटेक्टरच्या मदतीने लपवलेले सोने भेटले. दरम्यान मुख्य आरोपीला चोरीचा मुद्देमाल लपवण्यास मदत केल्याप्रकरणी त्याच्या कुटूंबालाही अटक करण्यात आहे.
पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांनी सांगितले, फिर्यादी दिपक माने यांचे राज कास्टींग नावाचे दुकान आहे. त्यांना १ जानेवारी रोजी दुकानात चोरी झाल्याचे दिसले. दुकानाची व तिजोरीची चावी वापरुन चोरी झाल्याचा त्यांनी अंदाज वर्तवला. त्यानूसार सध्या कामाला असलेले आणि काम सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरु केली. दरम्यान दुकानात काम करणारा मुख्य आरोपी सुनिल कोकरे हा आजी वारल्याचे सांगुन दोन दिवसांपुर्वी गावाला जाते असे सांगून गेला होता.
मात्र तांत्रिक विश्लेषणात तो पुण्यातच असल्याचे समजले. तर त्याचा मित्र अनिल गारळे हा मात्र पुणे सोडून गेल्याचे आढळले. यामुळे पोलिसांचा त्याच्यावरच संशय बळावला. त्यानुसार मुख्य आरोपी सुनिल कोकरे आणि त्याचा एक साथीदार तानाजी खांडेकर यांना सांगलीतील जत येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी ही चोरी अनिल गारळे याच्या मदतीने केल्याचे सांगितले. दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अनिल गारळे याला कोल्हापूर येथून ताब्यात घेतले होते. त्यांना पोलिशी खाक्या दाखवताच त्यांनी सुनिल गोगरे याने शेतात आणि हत्ती घासमध्ये रोकड व सोने लपवले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तेथून सुमारे तीन किलो सोने व ७ लाख ७३ हजाराची रोकड जप्त करण्यात आली.
तर सुनिल कोकरे याच्या घरातून आणि शेतातून सुमारे अर्धा किलो सोने आणि दिड लाखाची रोकड हस्तगत करण्यात आली. हा चोरीचा मुददेमाल लपवून ठेवण्यास मदत केल्याप्रकरणी कोकरेची आई राजश्री कोकरे, भाऊ अनिल कोकरे, नवनाथ कोकरे यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी पीव्हीसी पाईपमध्ये ठेवलेली ५० हजाराची रोकड काढून दिली. आरोपींकडून एकूण ३ किलो ४८० ग्रॅम सोने आणि ९ लाख ७३ हजाराची रोकड जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहायक आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक(युनिट १) शब्बीर सय्यद, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, आशिष कवठेकर, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, सहायक उपनिरीक्षक, राहुल मखरे अंमलदार मेहबुब मोकाशी, निर्मला शिंदे, प्रमोद मोहिते, गणेश दळवी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे, पंकज देशमुख तुषार, खडके , अजित शिंदे , अनिकेत बाब, शशिकांत दरेकर आणि शशिकांत ननावरे यांच्या पथकाने केली.
दुकानाच्या मालकाचा मावस भाऊ संबंधीत दुकानाचे व्यवस्थापन पहात होता. त्याच्या खोलीतच मुख्य आरोपी सुनिल कोकरे आणि अनिल गारळे रहायला होते. अनिल गारळेने मालकाच्या मावस भावाच्या बॅगेतून दुकानाची चावी चोरुन सुनिल कोकरेला दिली. सुनिलने रात्री चोरी केल्यानंतर चावी परत अनिलला दिली. त्याने ती गुपचुप पुन्हा बँगेत ठेऊन दिली.