मुंबई – 2021 च्या दुसऱ्या सहा महिन्यांमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये घट झाली होती. मात्र, नव्या वर्षात सोन्याचा दर परिस्थितीजन्य कारणामुळे 55 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीपर्यंत जाऊ शकतो असे एकूण वातावरण आहे.
ओमायक्रॉनमुळे जागतिक वाहतुकीवर थोडाफार परिणाम होण्याची शक्यता आहे. महागाई वाढणार आहे आणि डॉलर वधारणार आहे. या तीन कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते असे विश्लेषकांना वाटते. ऑगस्ट 2021 महिन्यामध्ये सोन्याचा दर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीपर्यंत वाढला होता. मात्र, नंतर त्यामध्ये घट होऊन सोने सध्या 48 हजार रुपयांच्या पातळीवर आहे.
जानेवारी 2021च्या तुलनेत सध्या सोन्याचे दर चार टक्क्यांनी कमी आहेत. रिझर्व्ह बॅंकांनी मोठ्या प्रमाणात भांडवल सुलभता निर्माण केल्यामुळे सरलेल्या वर्षात सोन्याने कमी परतावा दिला असल्याचे मत कॉम ट्रेन्डज संस्थेचे संस्थापक गणशेखर त्यागराजन यांनी सांगितले. युरोप आणि अमेरिकेसह भारतामध्ये करोनाच्या काळात मोठ्या सवलती दिल्यामुळे बाजारात पैसा वाढला आहे. त्यामुळे महागाई वाढत आहे. आता विविध बॅंका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेचा डॉलर वधारू शकतो. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावाही कमी होऊ शकतो.
अशा अवस्थेत सोन्याची मागणी वाढू शकते. या कारणामुळे मध्यम पल्ल्यात तरी सोन्याचे दर वाढण्याची जास्त शक्यता आहे. दरम्यानच्या काळात शेअर बाजाराचे निर्देशांकात कमी होत आहेत. ही गुंतवणूक काही प्रमाणात सोन्याकडे वळू शकते. त्याचबरोबर तैवान व युक्रेनवरून जागतिक तणावात वाढ झाली तर अशा अवस्थेत सोन्याचा दर आणखी वाढू शकतो. अशा अवस्थेत 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत सोन्याचा दर जागतिक पातळीवर 1,900 डॉलर तर दुसऱ्या सहामाहीत 2,000 डॉलरपर्यंत जाऊ शकेल.
भारतात पहिल्या सहामाहीत सोन्याचा दर 50 हजार रुपये तर दुसऱ्या सहामाहीत 55 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सोन्याच्या किमती नव्या वर्षात 1,970 डॉलरच्या पुढे गेल्यानंतर सोने आणखी वाढू शकते. भारतात नवीन वर्षात सोन्याचा दर 51,800 रुपयांच्या पुढे गेल्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. भारतामध्ये सोने नियंत्रणासाठी भारत सरकारने हालमार्क बंधनकारक केले आहे. त्यामुळे आगामी काळात भारतातील बरेच सोने औपचारिक क्षेत्रात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.