पुणे – आईला कामावरुन काढले म्हणून एका तरुणाने साथीदारांच्या मदतीने कंपनीची तोडफोड केली. लोखंडी कोयत्यांनी कंपनीचे केबीन फोडून कोयते दाखवत दहशत माजवली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास जानकर (22), केतन मोरे(21), राजेश चव्हाण (26), सागर अहिरराव (25) आणि चेतन पाटील (23) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीधर नायडू (62,रा.वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
नायडू यांच्या कंपनीत सागर अहिरराव याची आई कामाला होती. तीला काही कारणांवरुन कामावरुन काढण्यात आले होते. याचा राग मनात धरुन सागरने साथीदारांच्या मदतीने कोयते घेत कंपनीत प्रवेश केला. यानंतर फिर्यादीला उलटा कोयता मारत जखमी केले. यानंरत तीन केबिनची तोडफोड केली. जाताना कोयते हवेत फिरवत कमागारांना दहशत माजवली. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
—————-
कात्रज परिसरात घरफोडी
गाडी धुवायला घेऊन गेलेल्या व्यक्तीच्या घरात दिड लाखाची घरफोडी झाली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित भास्कर (24,रा.मागडेवाडी, कात्रज ) असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे गाडी धुण्यासाठी व नंबरप्लेट बसवण्यासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या घराचे कुलूप व कडी कोयंडा उचकटून सहा तोळ्याचे दागिने व दहा हजाराची रोकड असा 1 लाख 58 हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.