पुणे – वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून सख्ख्या बहिणीला पेटवून देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना औंध येथील अनुसया सोसायटीत घडली. यात पीडित बहीण गंभीर जखमी झाली आहे.
याप्रकरणी शरद मोहन पतंगे (45, रा. यशोधन सोसायटी, चिंतामणीनगर फेज-2, बिबवेवाडी) याला चतु:शृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत राजश्री पतंगे (48, रा. अनुसया हौसिंग सोसायटी, औंध) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद आणि राजश्री हे भाऊ-बहीण आहेत. दोघांचा वडिलोपार्जित संपतीवरून वाद आहे. त्यांच्या वडिलांचे दोनच वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
शुक्रवारी (दि.24) दुपारी शरद हा मद्यप्राशन करून राजश्री यांच्या घरी गेला. त्यावेळी त्या खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांच्यात संपत्तीतून पुन्हा वाद झाले. याचदरम्यान त्याने काडेपेटीने राजश्री यांना पेटवून दिले. यात राजश्री गंभीर जखमी झाल्या.
याप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. पवार करीत आहेत.