ठोसेघर -जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावरील रंगीबेरंगी फुलोत्सवास सध्या बहर येऊ लागला आहे. दुर्मिळ प्रजातींच्या फुलांचे गालिचे पाहण्यास राज्यासह विदेशी पर्यटकांनीही रविवारी हजेरी लावली.
कासला जागतिक वारसास्थळ घोषित केल्यापासून हा परिसर निसर्गप्रेमी व पर्यावरण अभ्यासकांसाठी कुतुहलाचा विषय ठरला आहे. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी झाली होती.
कोविडच्या संकटामुळे गेल्या वर्षी कास पठारावरील फुलोत्सवाचा दुर्मिळ नजराणा पर्यटक व निसर्गप्रेमींना पाहायला मिळाला नव्हता. यावर्षी कोविड संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्याने शासनाने पठारावरील पर्यटनास हिरवा कंदील दाखवला. यंदाच्या हंगामात गेल्या काही दिवसांपासून पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
हंगामाच्या प्रारंभी बदलत्या हवामानामुळे पठारावरील फुलोत्सव म्हणावा तसा बहरला नसल्याने अनेकांची घोर निराशा झाली होती; परंतु आता कास परिसरात फुलांसाठी अनुकूल हवामान तयार झाल्याने रंगीबेरंगी फुलांचे गालिचे दृष्टीस पडू लागले आहेत. लाल, पिवळ्या, जांभळ्या व नानाविध रंगांच्या फुलांच्या बहरासह पर्यटकांनीही पठार बहरत आहेत. पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.