पुणे – कौटुंबिक हिंसाचाराची फिर्याद देण्यासाठी मुलीबरोबर हडपसर पोलिस ठाण्यात आलेल्या सासुवर जावयाने पाया पडायचे म्हणत चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस ठाण्याच्या आवारातच घडला. परंतु दक्ष पोलिस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठी अनर्थ टळला. या सर्व प्रकारात सासूच्या गालाला जखम झाली आहे. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मंगेश महादा तारे (29, वडगावशेरी) असे हल्ला करणाऱ्या जावयाचे नाव असून हडपसर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात पुष्पा दामोदर पालवे (46, महादेव नगर मांजरी) या जखमी झाल्या आहेत. तर आरोपीचे सासरे दामोदर पालवे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगेश तारे आणि पूजा तारे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. पती मंगेश हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने पूजा या आपल्या आईकडे आल्या होत्या. त्यानंतर त्या तक्रार देण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात आले असता आमच्या दोघांमध्ये कसलेही वाद नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना तो सासूच्या पाया पडतानाच त्याने जर्किंगच्या खिशात भाजी कापण्याचा आणलेला चाकू अचानक बाहेर काढत सासूवर वार करण्याचा प्रयत्न केला.