पुणे – गोखलेनगरमध्ये तीन जणांच्या टोळक्याने कोयते नाचवत दहशत माजवली. यानंतर परिसरात लावलेल्या दहा वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनूसार मध्यरात्री तीनच्या सुमारास कोयते नाचवत तीन जणांचे टोळते जनवाडी परिसरात आले.
ते रस्त्याने दहशत माजवत चालले होते. परिसरात असलेल्या काही तरुणांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याने ते पळत जनवाडीच्या शेवटच्या टोकाला आले. तेथे त्यांनी दिसेल त्या वाहनांवर कोयत्याने वार करत तोडफोड केली. यानंतर घरांवर दगडफेक करत दहशत माजवली. हा प्रकार सुमारे अर्धा तास सुरु होता. मात्र नागरिक दहशतीच्या भितीने घराबाहेर आले नाहीत. त्यांनी परिसरातील सहा रिक्षा, दोन दुचाकी आणि दोन कारची तोडफोड केली.
महिलेने दाखवली सजगता –
आरोपींकडून दहशत पसरवली जात असताना परिसरात रहाणाऱ्या एका ज्येष्ठ महिला एकटी घराबाहेर पडली. तीने आजूबाजूच्या नागरिकांचे दरवाजे ठोठावून त्यांना बाहेर बोलावून घेतले. मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडल्याने आरोपींने तेथून काढता पाय घेतला. मागील दिड वर्षातील ही तीसरी घटना असून एकदा वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचे ज्येष्ठ महिलेने सांगितले. येथे बहुतेक जण हातावर पोट असणारे रहिवाशी आहेत.
अनेक रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. दत्ता पोळेकर हा तरुण शिफ्टने रिक्षा चालवतो. त्याच्या रिक्षाचीही तोडफोड करण्यात आली आहे. त्याचा रोजगार बुडाल्याने तसेच रिीाचे नुकसान झाल्याने तो हळहळ व्यक्त करत होता. रात्र गस्तीवरील पोलीस घटना घडल्यानंतर दोन तासाने दाखल झाले. त्यांनी माहिती घेऊन तक्रार नोंदवण्याचे काम सुरु केले आहे. मात्र घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.