मुंबई – बॅंक घोटाळ्याच्या आरोपावरून सीबीआयने अटक केलेलेल्या आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला आहे. चंदा कोचर यांच्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई कायद्याला धरून नाही असा स्पष्ट निष्कर्ष उच्च न्यायालयाने नोंदवल्याने या प्रकरणात सीबीआय तोंडघशी पडली आहे.
व्हिडीओकॉन-आयसीआयसीआय बॅंक कर्ज प्रकरणी कोचर दाम्पत्याला सीबीआयने ने 23 डिसेंबर 2022 रोजी अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पी के चव्हाण यांच्या खंडपीठाने कोचरांना प्रत्येकी एक लाख रुपयांची रोख जामीन रक्कम तसेच तेवढ्याच रकमेची हमी सादर करण्याची सुचना केली आहे. दोघांनी तपासात सहकार्य करावे आणि जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावले जाईल तेव्हा सीबीआय कार्यालयात हजर राहावे अशी सुचनाही कोर्टाने केली आहे. त्यांची अटक कायद्यातील तरतूदीनुसार केली गेली नव्हती, त्यामुळे त्यांना सोडून द्यावे लागत आहे असे कोर्टाने अत्यंत स्पष्ट शब्दात नमूद केले आहे.
कोर्टाने कोचर यांना त्यांचे पासपोर्ट सीबीआयकडे जमा करण्यास सांगितले आहे. आपल्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईला कोचर दाम्पत्याने हायकोर्टात आव्हान दिले होते त्यावर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. कोचर दाम्पत्याने व्हिडीओकॉन समुहाचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याशी संगनमत करून त्यांना बेकायदेशीरपणे 3250 कोटी रूपयांचे कर्ज दिले होते. त्या संबंधात सीबीआयने कोचर दाम्पत्यावर ही कारवाई केली होती.