पुणे – प्ले बॉय होण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या तरुणाची सायबर भामट्यांनी 17 लाख 38 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याने निवृत्त झालेल्या वडिलांनी मुदत ठेवीत ठेवलेले पैसे भामट्यांना दिले होते.
याबाबत एका 27 वर्षीय तरूणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दयाशंकर मिश्रा, रागिणी, विक्रम सिंग तसेच साथीदारांवर माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरूण बेरोजगार आहे. वर्षभरापूर्वी त्याने समाजमाध्यमावर प्लेबॉय झाल्यास भरपूर कमाईची संधी अशी जाहीरात वाचली होती. जाहीरातीतील आमिषाला तरूण बळी पडला आणि त्याने भामट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.
भामट्यांनी त्याला आमिष दाखवले तसेच इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल, असे सांगितले. प्लेबॉय होण्यासाठी परवाना काढावा लागतो, अशी बतावणी भामट्यांनी केली. त्यानंतर भामट्यांनी काही पैसे जमा करावे लागतील, असे सांगून तरुणाला वेगवेगळ्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले.
तरुणाला वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखविण्यात आले. तरुणाचे वडील सेवानिवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी बॅंकेत मुदतठेव स्वरुपात पैसे ठेवले होते. तरूणाने वडिलांकडून वेळोवेळी पैसे घेतले आणि चोरट्यांच्या बॅंक खात्यात 17 लाख 38 हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले तसेच तरुणाला प्रतिसादही दिला नाही. फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे तपास करत आहेत.
फिर्यादीला आरोपींनी एक ते दोन तासात अडीच ते तीन हजार कमवा असे आमिष जाहिरातीतून दाखवले होते. यानंतर त्याच्याकडून परवाना शुल्क, पोलीस व्हेरिफिकेशन, पिकअप ड्रॉप, लेट फी, पॉलीशी रक्कम या नावाखाली फोन पे व्दारे पैसे घेतले.