पुणे – घराजवळील जागेत सिमेंटचा कट्टा बांधण्याच्या कारणावरुन शेजायांनी एकाच कुटुंबातील चौघांना हातोडा, फावड्याने जबर मारहाण केली. घटनेत चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील मेगासिटी परिसरात घडली. याप्रकरणी सुनील शिंदे (वय ३८, रा. कर्वे रस्ता) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुनील एरंडवण्यातील त्यांच्या घराजवळ थांबले होते. त्यावेळी त्यांची मानलेली बहिण तेथून पळत जाताना दिसली. त्यांनी तिला विचारणा असता, भाउ मनोज पवार याला मारण्यासाठी काहीजण आल्याचे तिने सुनीलला सांगितले. त्यामुळे ते तत्काळ मनोज घरी गेले असता, मनोज राहात असलेल्या घराजवळ सिमेंटचा कट्टा बांधत होता. संबंधीत जागेवरुन मनोज आणि शेजायांची भांडणे सुरू होती.
मोकळ्या जागेत कट्टा बांधत असल्याच्या कारणावरुन आरोपींनी मनोजला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यावेळी सुनीलने मध्यस्थी करून भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने आरोपींनी त्यांच्या डोक्यात हातोड्याने मारहाण केली. त्यानंतर मनोज यांच्या डोक्यात फावडे मारून त्यांनाही जखमी केले. आरोपींनी सुनील यांची बहिण, भाऊ व पत्नीलाही फावडे आणि दगडाने मारहाण केली. घटनेत कुटुंबातील चौघेजण जखमी असून टोळक्याने सुनील यांच्या मोटारीच्या काचा फोडून नुकसान केले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रमसिंह पवार करीत आहेत.