पुणे – पीएमपी बस प्रवाशांकडील दागिने लांबविणारे चोरट्यांनी उच्छाद मांडला असून पीएमपी बस प्रवासी महिलेकडील ७५ हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना कर्वे रस्त्यावर घडली.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्ता परिसरात राहायला आहेत. गेल्या आठवड्यात त्या कामानिमित्त लक्ष्मी रस्ता परिसरात आल्या होत्या. लक्ष्मी रस्त्यावरील थांब्यावरून त्या बसने कर्वे रस्त्याकडे निघाल्या होत्या. त्या वेळी बसमध्ये गर्दी होती. चोरट्याने बस प्रवाशात त्यांच्या हातातील ७५ हजारांची सोन्याची बांगडी कटरच्या सहाय्याने कापून नेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करत आहेत.
दरम्यान, पीएमपी बस प्रवासी संख्येवरील निर्बंध कमी झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बस प्रवाशांकडील ऐवज तसेच रोकड लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये चोरटे शिरून महिला प्रवाशांच्या पिशवीतील दागिने तसेच बांगड्या लांबवितात. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलांना लक्ष्य केले असून कटरचा वापर करून बांगड्या कापून चोरटे पसार होतात.