पुणे – बिबवेवाडी भागात रविवारी रात्री टोळक्याने दहशत माजवून एका युवकावर वैमनस्यातून गोळीबार केल्याची घटना घडली. तरुण घटनास्थळावरुण पळाल्याने बचावला. यांनतरही टोळक्याने परिसरात दहशत माजवली. संबंधीत तरुणही दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
याप्रकरणी सौरभ सरवदे, रूपेश सोनवणे उर्फ डीजे, निलेश सोनवणे, गणेश जगदाळे, बाबा बडबडे, अनिल कांबळे यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित कैलास थोपटे ( 32, रा. शिवशंकर सोसायटी, बिबवेवाडी) याने यासंदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. थोपटे याचे दत्तवाडी भागात केशकर्तनालय आहे. तीन दिवसांपूर्वी थोपटेचा आरोपींशी वाद झाला होता. रविवारी थोपटे, त्याचा भाऊ आणि मित्र रात्री अकराच्या सुमारास शिवशंकर सोसायटीच्या परिसरात थांबले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांच्याकडे काठ्या तसेच शस्त्रे होती. शिवीगाळ करणाऱ्या टोळक्याने थोपटेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि आरोपी सौरभ सरवदे याने त्याच्याकडील पिस्तुल थोपटेवर रोखले. पिस्तुल रोखल्यानंतर थोपटे, त्याचा भाऊ, मित्र तेथून पळाले. सरवदेने त्याच्याकडील पिस्तुलातून दोन गोळ्या थोपटेच्या दिशेने झाडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. थोपटेशी वाद झाल्यानंतर आरोपींनी त्याला बाहेर भेटण्यासाठी बोलावले होते. थोपटेने आरोपींना भेटण्यास नकार दिल्यानंतर रविवारी रात्री आरोपी त्याच्या घराजवळ आले आणि दहशत माजवून गोळीबार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
शहरातील उपनगरात गुंडगिरी फोफावली असून उपनगरात किरकोळ वादातून सामान्यांच्या वाहनांची तोडफोड, दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पोलिसांकडून सराइत गुंड टोळयांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे.