पुणे – विमा पॉलिसीचे पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने शहरातील एका डॉक्टरांना सायबर चोरट्यांनी तब्बल 1 कोटी 49 लाख 44 हजार 400 रुपयांचा आर्थिक गंडा घातला. वेगवेगळ्या 18 बँकामधील 41 बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडून ही फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी बिबवेवाडीत परिसरातील 57 वर्षाच्या डॉक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2017 पासून सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टरांनी 2013 मध्ये विमा पॉलिसी उतरवली होती. या पॉलिसीबाबत यांनी चौकशी करताना त्यांना इंटरनेटवर एक नंबर मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क साधला होता. मात्र तो नंबर सायबर चोरट्यांचा होता. डॉक्टर जाळ्यात सापडल्यानंतर त्यानंतर सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या मेल आयडीवरुन तसेच प्रत्यक्ष कॉल करुन त्यांना संपर्क साधला. त्यांना पॉलिसीचे 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे परत मिळवून देतो, असे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. पैसे मिळत असल्याचे पाहून डॉक्टर देखील सायबर चोरट्यांच्या प्रलोभनाला बळी पडले.
चोरट्यांनी त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी आश्वासने देऊन त्यांना पैसे भरायला भाग पाडले. अशा प्रकारे त्यांच्याकडून सायबर चोरट्यांनी 18 वेगवेगळ्या बँकांमधील 41 खात्यांमध्ये
1 कोटी 49 लाख 44 हजार 400 रुपये भरायला भाग पाडून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक चिंतामण अधिक तपास करीत आहेत.