पुणे -शहरातील करोना बाधित दर शनिवारी 3.86 टक्के राहिले. दरम्यान, नव्याने 226 बाधित सापडले असून, 335 जण करोनामुक्त झाले. तीन दिवसांपूर्वी शहरातील बाधित संख्या तीनशेच्या पुढे गेली. मात्र, मागील दोन दिवसांपासून बाधित संख्या पुन्हा कमी होताना दिसत आहे.
गेल्या 24 तासांत करोनामुळे 15 जणांचा मृत्यूची नोंद झाली. यात शहर हद्दीतील 5 जणांचा समावेश आहे. शहरात दिवसभरात 5 हजार 859 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत 26 लाख 46 हजार 449 जणांच्या नमुने तपासणीतून 4 लाख 77 हजार 310 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
म्हणजे पुणे शहरातील एकूण बाधित दर 18 टक्के इतका राहिला आहे. एकूण बाधितांपैकी 4 लाख 66 हजार 337 जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे करोनामुक्तीचे प्रमाण 97.70 टक्के इतके आहे.
आतापर्यंत करोनामुळे 8 हजार 565 जणांचा मृत्यू झाला असून, हा दर 1.80 टक्के इतका राहिला आहे. सध्या 2 हजार 408 सक्रीय बाधित असून, त्यातील 309 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 435 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.