पुणे – शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना बेड मिळावा, यासाठी महापालिकेने हेल्पलाइन सुरू केली होती. त्यावर मागील चार महिन्यांत 34 हजार 800 फोन कॉल्स आले आहेत. त्यातील सुमारे 7 हजार 789 जणांना बेड उपलब्ध करून देण्यात आले.
महापालिकेने 24 मार्चपासून ही हेल्पलाइन सुरू केली. त्यावेळी केवळ 5 लाइनद्वारे ही सेवा सुरू होती. त्यानंतर 13 लाइन्स वाढवण्यात आल्या. यावर 24 मार्च ते 24 जूनअखेर एकूण 34 हजार 800 कॉल्स आले.
त्याद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या 7 हजार 798 बेड पैकी 4,225 ऑक्सिजन, तर 357- आयसीयू, 304 व्हेंटिलेटर बेड, तर 2,902 आयसोलेशन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर सुमारे 27 हजार फोन कॉल इतर चौकशी आणि होम आयसोलेशन संदर्भातील होते, असे आरोग्य विभागाने सांगितले.
दरम्यान, करोनाचा दुसऱ्या लाटेवेळी साधारणपणे एप्रिल ते मे या कालावधीत शहरात करोना रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले होते. त्यावेळी काही खासगी रुग्णालयांनी अडवणूकही सुरू केली होती. त्यावेळी महापालिकेने पुढाकार घेत ही हेल्पलाइन सुरू केली होती.
सुरुवातीला फोन लाइन कमी असल्याने अनेकदा हे कॉल लागत नव्हते. तर, कॉल लागूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. अखेरीस हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते.
त्यावेळी खुद्द महापौरांनी पुढाकार घेत, या हेल्पलाइनचे काम खासगी कंपनीला देण्यात आले. त्यानंतर या कामात काहीशी सुधारणा दिसून आली. तर, पुढे करोनाचे रुग्णही कमी झाल्याने या यंत्रणेवरील ताणही काहीसा हलका झाला आहे. तर, या हेल्पलाइनमुळे जवळपास 8 हजार जणांना बेड मिळाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
टीका झाली, पण महत्त्वाची मदतही
करोनाकाळात या हेल्पलाइनबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तक्रारी तसेच थेट उच्च न्यायालयाने व्यक्त केलेली नाराजी यामुळे महापालिकेस मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. पण, दुसऱ्या बाजूना अनेक रुग्णांना या हेल्पलाइनचा फायदा झाल्याचे या आकडेवारीवरून समोर आले आहे.
करोनाची साथ उच्चांकावर असताना हेल्पलाइनवर दिवसाला
700 ते 800 कॉल येत होते. अशा काळात अनेकांना तातडीनं बेड उपलब्ध करून देत त्यांचे जीव वाचवता आले. हेल्पलाइनबाबत तक्रारी असल्या, तरी महापालिकेने या सेवेतून जास्तीत जास्त रुग्णांना तातडीची वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुढील काळातही ही हेल्पलाइन सुरूच असेल.
– मुरलीधर मोहोळ, महापौर