पुणे – पीएमपी बससाठी ओल्या कचर्यापासून सीएनजी गॅस तयार करण्यासाठी सूस येथे उभारण्यात आलेला कचरा प्रकल्प बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांसह महापालिकेत आलेल्या माजी आमदर मेधा कुलकर्णी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. यावर महापालिकेने या प्रकल्पातील समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रकल्प बंद करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. दरम्यान, या प्रकरणी येत्या शुक्रवारी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिकेने दिले असले तरी ३१ डिसेंबरपर्यंत प्रकल्प बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आमदार कुलकर्णी यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण ?
महापालिकेने २०१६ मध्ये सूस रस्त्यावर नोबेल एक्स्चेंज कंपनीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. त्याठिकाणी शहरातील हॉटेलमधील ओला कचरा येतो. या ठिकाणच्या प्रक्रीया केल्यानंतर तयार होणारा गॅस लोणावळा येथे पाठविण्यात येऊन त्यावर प्रक्रिया करून पीएमपीच्या सीएनजी बससाठी गॅस तयार केला जातो. मात्र, या प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने याविरोधात स्थानिकांनी ऑॅक्टोबर २०२० राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) याचिका दाखल केली होती. त्यामध्ये नागरिकांच्या बाजूने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानेही नागरिकांच्या बाजूने निर्णय देत दोन महिन्यात हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
पण नवीन जागा मिळत नाही, असे कारण सांगत महापालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रकल्प स्थलांतरित करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा मेधा कुलकर्णी यांचा आरोप असून हा प्रकल्प बंद करावा, या मागणीसाठी त्या महापालिकेत गेल्या होत्या. यावेळी मेधा कुलकर्णी आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर हे दोघेही अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी ३१ डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प बंद केला जाईल, असे आश्वासन दिले आहे, न्यायालयाचा आदेशही आहे. त्यानुसार कार्यवाही करावी लागेल, हे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यावर शुक्रवारी बैठक घेऊन यावर तोडगा काढू, असे आश्वासन देण्यात आले.