पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) देखभाल दुरूस्तीसाठी देण्यात आलेल्या 150 मिडीबसचा करार रद्द करण्यात आला आहे. यासर्व बस पीएमपी मार्फत संचलनात आणाव्यात असा आदेश पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत.
पीएमपी प्रशासनाने ऑक्टोंबरमध्ये 117 मिडीबस आणि 33 तेजस्विनी बस ट्रान्सलिंक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी ड्रायव्हरसह देखभाल दुरूस्तीसाठी करार केला होता. प्रति किलोमीटरसाठी 42.99 रूपये दर निश्चित केले होते. स्वमालकीच्या बस ठेकेदाराला देखभाल दुरूस्तीसाठी दिल्याने पीएमपी प्रशासनावर चौफेर टीका झाली होती. पीएमपीचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमपीचे कारभार हाती घेण्यापुर्वीच हा करार झाला होता.
बकोरिया यांनी 150 बसचा आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक बोलविली होती. पीएमपीचे खाते प्रमुख आणि ट्रान्सलिंक इंडिया कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. यात ट्रान्सलिंक इंडिया कंपनीच्या प्रतिनिधीनी ही सेवा देणे परवडत नाही असे सांगितले. यावर बकोरिया यांनी परवडत नसेल तर करार रद्द करा आणि पीएमपी मार्फत बस संचलनात आणाव्यात असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. बकोरिया यांनी कारभार हाती घेतल्यानंतर पीएमपीची संचलन तुट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच पीएमपीच्या मालकीच्या बससे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पीएमपीच्या स्वमालकीच्या बस दिवसेंदिवस कमी होत आहेत. भविष्यात ठेकेदारांनी संप केला तर संपूर्ण पुण्याला वेठीस धरले जावू शकते. त्यामुळे स्वमालकीच्या बस ठेकेदारांना देण्याऐवजी पीएमपी स्वत चालवणार आहे. बस ठेकेदारांना चालवायला देण्याऐवजी स्वत: चालवू शकतो आणि आम्ही सक्षम आहोत असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
– ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी
चौफेर टीका…
पीएमपीच्या ताफ्यात एकूण 2142 बस आहेत. यातील 1130 बस ठेकेदाराच्या तर 1012 बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. पीएमपीच्या स्वमालकीच्या बस देखभाल दुरूस्तीसाठी पीएमपीचे वर्कशॉप आहेत. या तांत्रिक काम करणारे कर्मचारी आहेत. पीएमपीत कर्मचारी आणि वर्कशॉप असताना या बस ठेकेदारांना देखभाल दुरूस्ती करता दिल्याने पीएमपीवर चौफेर टीका होत होती. तसेच या बस ठेकेदारांना चालवायला दिल्याने स्वमालकीच्या बसची संख्या कमी झाल्या होत्या.