बावधन – युवकांच्या क्रीडा कौशल्याला आणि कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धा होणे आवश्यक आहे. त्यातूनच भविष्यात देशाचे प्रतिनिधीत्व करणारे अष्टपैलू खेळाडू घडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी व्यक्त केला.
भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या वतीने आयोजीत भोर विधानसभा नमो चषकाचा शुभारंभ अमृता फडणवीस आणि अंकिता पाटील- ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्या बोलत्या होत्या. यावेळी राष्ट्रीय स्तरावर विविध खेळात प्राविण्य मिळविलेल्या खेळांडूंचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते नमो पुरस्कार देऊन करण्यात आला.
यामध्ये देविका पळशीकर (क्रिकेट), निव कोठारी (टेनिस), सिद्धांत कांबळे (स्केटिंग), ओंकार दगडे (रायफल /पिस्तूल इव्हेंट्स ग्रुप बी), ऐश्वर्या भोंडे (फुटबॉल), अर्णव पापरकर (टेनिस), सानिया कंधारे (कबड्डी), वृषाली ठाकरे (पीक बॉल गेम्स), योशिरो सरकार (स्केटबोर्डिंग) यांचा समावेश आहे. या नमो चषकामध्ये क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, बॅडमिंटन, धावणे स्पर्धा तसेच सांस्कृतिक महोत्सवात चित्रकला, रांगोळी, गीत गायन,नृत्य स्पर्धा, एकांकिका,वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विजयी स्पर्धकांना राज्यस्तरीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे.