पुणे – शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांत किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली आहे, त्यामुळे शहराच्या उपनगरभागातील एनडीए, पाषाण, हवेली तर जिल्ह्यातील बहुतांश भागात कडाक्याची थंडी वाजत आहे. शहरात आज शिवाजीनगर भागात ११.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरपेक्षा पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली जिल्हे अधिक गारठले आहेत.
दक्षिण कर्नाटकवर असलेली द्रोणीका स्थिती मध्य छत्तीसगडपर्यंत आहे. त्यामुळे आद्रता वाढल्याने पुढील दोन दिवस किमान व कमाल तापमानात फारसा परिणाम होणार नाही. आज, दिवसभरात जळगाव येथे सर्वांत कमी १०.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुणे शहरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील. दि. २२ जानेवारील ढगाळ हवामान राहील, तर त्यानंतर शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट होण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासांत शहरातील किमान तापमान…
हवेली ९.७ , शिरूर १०.२, पाषाण १०.९, शिवाजीनगर ११.५, राजगुरूनगर ११.८, बारामती ११.९, एनडीए आणि आंबेगाव १२.२, इंदापूर १२.६, लवासा १३.४, दापोडी १५.७, चिंचवड १६.१, कोरेगाव पार्क १६.४, मगरपट्टा १६.९, वडगावशेरी १७.१