पुणे – मास्क न परिधान करणाऱ्या दोघांना लष्कर न्यायालयाकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सलाउद्दीन शमशुद्दीन मलिक (वय २६, रा.भीमपुरा,लष्कर) आणि नूर महंमद शेख (वय ४३,रा.नाना पेठ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मास्क न परिधान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.मलिक आणि शेख दोघे जण लष्कर भागातून वाहनातून जात होते.नाकाबंदीत पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले.तेव्हा त्यांनी मास्क न परिधान केल्याचे उघड झाले.पोलिसांनी दोघांविरोधात संचारबंदीचा आदेशाचा भंग तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याान्वये गुन्हा दाखल केला.
त्यानंतर लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिळमकर, राठोड, कडूकर, तांबोळी, होले, महामुलकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर एका दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.न्यायालयाने मलिक आणि शेख यांना दोषी ठरवून प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.