T20 World Cup 2024 : बांगलादेशचा सुपर-8 मध्ये प्रवेश, नेपाळला 21 धावांनी केलं पराभूत…

T20 World Cup 2024 (Bangladesh Vs Nepal) : – आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ३७ व्या सामन्यात बांगलादेशने दमदार कामगिरी करत नेपाळचा २१ धावांनी पराभव केला. या विजयासह त्याने यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ केवळ ८५ धावाच करू शकला. बांगलादेशसाठी घातक गोलंदाजी करताना तांझिम हसन शाकिबने ४ बळी घेतले. नेपाळकडून कुशल मल्लाने सर्वाधिक २७ धावा केल्या.
बांगलादेशच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला नेपाळचा संघ १९.२ षटकांत ८५ धावा करून सर्वबाद झाला. नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. कुशल मल्लाने ४० चेंडूत २७ धावा केल्या. दीपेंद्र सिंगने ३१ चेंडूत २५ धावा केल्या. सलामीवीर आसिफ शेख १७ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार मारले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सलामीवीर कुशल भुरटेल अवघ्या ४ धावा करून बाद झाला.
Bangladesh 🆚 Nepal | ICC Men’s T20 World Cup
Bangladesh won by 21 runs 👏🇧🇩Photo Credit: ICC/Getty#BCB #Cricket #BANvNEP #T20WorldCup pic.twitter.com/iZw7UoaeXE
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2024
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर तांझिद हसनला सोमपाल कामीने बाद केले. तो खाते न उघडताच तंबूत परतला. यानंतर कर्णधार नझमुल हसन शांतोही केवळ चार धावा करून माघारी परतला. या सामन्यात बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. लिटन दासने १०, शाकीब अल हसनने १७, तौहादी हृदयाने ९, महमुदुल्लाहने १३, झाकेर अलीने १२, तांझिम हसन शाकीबने ३, रिशाद हुसेनने १३, मुस्तफिजुर रहमानने ३ आणि तस्किन अहमदने नाबाद १२ धावा केल्या. नेपाळकडून सोमपाल कामी, दीपेंद्र सिंग एरी, रोहित पौडेल आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
बांगलादेशने नेपाळला हरवून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. त्याने आतापर्यंत ४ सामने खेळले असून ३ जिंकले आहेत. यासोबतच एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशचे ६ गुण आहेत. हा संघ ड गटात आहे. यासह दक्षिण आफ्रिका सुपर ८ मध्ये पोहोचला आहे. बांगलादेश सुपर ८ साठी पात्र ठरल्याने नेदरलँड्सचे स्वप्न भंगले आहे.
T20 World Cup 2024 (Super-8) : …तर निकाल निश्चित करण्यासाठी 5-5 षटकांचा होणार सामना
संक्षिप्त धावफलक – बांगलादेश – १९.३ षटकांत सर्वबाद १०६ धावा. (शकिब उल हसन १७, रिषद हुसेन १३, संदीप लमिछने २-१७). नेपाळ – १९.२ षटकांत सर्वबाद ८५ धावा. (कुशल मल्ला २७, दीपेंद्रसिंह अरी २५, तनझीम हसन ४-७, मुस्तफिजूर रेहमान ३-७).





