Maharashtra Politics : महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार? केंद्रातून सूत्र हलल्याने चर्चा…

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Politics) आता सगळ्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. यंदाच्या लोकसभेच्या निकालाने सगळ्या देशाचे चित्र पालटले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये NDA म्हणून मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले असले तरी भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. बऱ्याच ठिकणी आपल्याला अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक फटका बसला.या निवडणुकीत भाजपला राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात फटका बसला.
भाजपमध्ये बदलाचे वारे वाहू लागले
या निवडणूकीनंतर भाजपमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. निवडणुकीत ४०० पार तर दूरच स्वबळावर बहुमताचा आकडाही पार न करु शकलेल्या भाजपमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘मला मंत्रिमंडळातून मोकळं करा’ अशी मागणी वरिष्ठांकडे केली होती. त्यांची ही मागणी हाय कमांडने फेटाळून लावत काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.
भाजपकडून प्रभारी आणि सह प्रभारी यांची नियुक्ती
येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्टात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रभारी आणि सह प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी भूपेंद्र यादव यांची प्रभारी आणि अश्विनी वैष्णव यांच्यावर सह प्रभारी म्हणून महाराष्ट्रासाठी निवड करण्यात आली आहे. या केंद्रीय मंत्र्यांच्या नियुक्तीनंतर राज्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा आढावा घेणार
या केंद्रीय नेत्यांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे काम पाहत आहेत तर भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून आशिष शेलार हे काम पाहत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या मतदार संघात लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पराभव सहन करावा लागला. या सगळ्यांचा आढावा प्रभारी आणि सह प्रभारी यांच्याकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजपमध्ये कोणते मोठे बदल पाहायला मिळतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





