पुणे(प्रतिनिधी ) : शहरातील पर्यावरणास घातक ठरणारे कार्बन उर्त्सजन कमी करण्यासह, शहरातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून आता शहरात निर्माण होणाऱ्या विघटनशील आणि अविघटशील कचऱ्यापासून लवकरच जैविक इंधनाचा नवीन पर्याय असलेल्या हायड्रोजन वायूची निर्मिती करणार आहे.
पुणे महापालिका, वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेत भारतातील पहिला प्रकल्प उभारला जाणार आहे. डीबुट पध्दतीने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे दिवसाला सुमारे 350 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून त्याद्वारे 150 टन आरडीएफ तर 9 मेट्रिक टन हायड्रोजन निमिर्ती केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हा प्रकल्प उभारण्यास नुकतीच परवानगी दिली असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रतिक कनाकीया यांनी ही माहिती दिली.
शहरात वाढत्या नागरिकरणा सोबतच शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची तसेच वाहनांच्या धूरांच्या प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. केंद्राच्या 100 रेजिलिएंट सिटीच्या अहवाला नुसार शहरातील कार्बन उत्सर्जन 1.46 टन प्रती वर्ष होते ते 2017 मध्ये तब्बल 1.64 टन झाले आहे. यात मोठया प्रमाणात शहरात तयार होणाऱ्या घनकचऱ्याचाही समावेश आहे.
असा असेल प्रकल्प…
या प्रकल्पात बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेबल तसेच घरगुती घातक मिश्र कचऱ्यावर ऑप्टीकल सेन्सर वापरून आधी विलग केला जाईल. त्यातील ओल्या कचऱ्याचा वापर जैविक खते तयार करण्यासाठी केला जाईल. नंतर इतर कचऱ्यावर पासून आरडीएफ केले तर जाईल तर त्यानंतरच्या कचऱ्यावर प्रक्रीया करून प्लाझ्मा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोजन वायु तयार केला जाईल. भाभा अनुसंधान संस्था आणि आयआयएससी बेंगलुरू, यांच्याशी सहकार्याने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. केंद्रशासनाची बेसिल ही संस्था प्रकल्पाची सल्लागार संस्था आहे.
हा कचरा शास्त्रोक्त पध्दतीने भूगर्भात कॅपिंग केला तरी त्यापासून मोठया प्रमाणात मिथेन वायू तयार होतो. तसेच त्यासाठी मोठया प्रमाणात जागाही लागते. ही बाब लक्षात घेऊन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीचा हा प्रकल्प शहरासाठी वरदान ठरणार आहे. तसेच या तून निर्माण होणारा गॅस घरगुती तसेच व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच शहरातील कार्बन उर्त्सजन कमी होण्यासही हातभार लागणार आहे.