पुणे –वनाज ते सिव्हील कोर्ट दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गातील नदीपात्राच्या भागातील गर्डर जोडण्याचे काम सध्या करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल देखील करण्यात आले आहेत. 24 ऑगस्ट पासून 12 सप्टेंबरपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
वनाज ते सिव्हील कोर्टादरम्यानच्या मेट्रोमार्गावर सुरू असणाऱ्या कामासाठी 24 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल केले आहेत. विश्रामबाग आणि डेक्कन वाहतूक विभागांतर्गत बदल करण्यात येणार असून, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश दिले. छत्रपती संभाजी महाराज पूल 24 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
हे आहेत पर्यायी मार्ग
खंडोजीबाबा चौकातून टिळक रस्त्याकडे जाण्यासाठी
खंडोजीबाबा चौकातून कर्वे रोडने शेलारमामा चौक – यशवंतराव चव्हाण चौक – रसशाळा चौक – डावीकडे वळून एस. एम. जोशी पूल – गांजवे चौकातून डावीकडे वळून टिळक चौक किंवा उजवीकडून शास्त्री रोडने दांडेकर पूलमार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.
टिळक चौकाकडून खंडोजी बाबा चौकाकडे जाणारा मार्ग
टिळक चौक – केळकर रोड – एलआयसी बिल्डींग – बालमुकुंद लाहोटी चौक- श्री हरी पवार चौक – माती गणपती चौक – कासट कॉर्नर – नारायण पेठ पोलीस चौकी – केसरी वाडा – रमणबाग शाळा चौक – डावीकडून वर्तक बाग – कॉसमॉस बॅंक चौक (शनिवार पेठ पोलीस चौकी) – बालगंधर्व पुलावरुन सावरकर भवन रस्त्यावरून डावीकडे वळून जंगली महाराज रोडने खंडूजीबाबा चौकात जाता येणार आहे.
मनपाकडे जाण्यासाठी
टिळक चौक- केळकर रोडने एलआयसी बिल्डींग – बालमुकुंद लाहोटी चौक – श्री हरी पवार चौकातून डावीकडे वळून नदीपात्र – ओंकारेश्वर मंदिर – टिळक पुलावरुन महापालिका – डावीकडे सावरकर भवन, बालगंधर्व रंगमंदिर – जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक येथे जाता येणार आहे.
यशवंतराव चव्हाण पुलावरुन फक्त दुचाकी वाहने ये-जा करू शकतील, असे वाहतूक विभागाने सांगितले.