पुणे –पुणे शहर वाहतूक पोलिसांनी “नो पार्किंग’मधील वाहने उचलण्यासाठी नेमलेली टोइंग वाहने हे त्यांनी केलेल्या करारातील नियम आणि अटींचा भंग करीत असुनही वाहतूक पोलीस उपायुक्तांचे याकडे दुर्लक्ष आहे.
नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी पूर्वी टेम्पो होते, त्यात दुचाकींचे नुकसान होत असल्याने हायड्रोलिकवर आधारित 25 टोइंग व्हॅनद्वारे वाहने उचलली जाऊ लागली. हायड्रॉलिक टोइंग व्हॅनमध्ये कॅमेरा, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस), सार्वजनिक घोषणा प्रणाली, सर्चलाइट आणि वाहतूक दंड भरण्यासाठी मशिन देण्यात आली आहे. नो पर्किंगमधल्या वाहनांचे फोटो या कॅमेराद्वारे तसेच एखादा वाहनचालक वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत असेल तर या कॅमेराचा उपयोग होतो. या कॅमेराने काढलेल्या फोटोची माहिती केंद्रीय सर्व्हरवर अपलोड केली जाते.
मात्र, अनेक टोइंग व्हॅनवरील कॅमेरेच गायब झाले असून काही कॅमेरे तुटलेले आहेत. तसेच, या टोइंग व्हॅन ठराविक ठिकाणीच फिरतात, त्यामुळे जीपीएस लोकेशन, कॅमेरे हे नागरिकांना दाखविण्यासाठी केलेला फार्स आहे का? कॅमेरा नसलेल्या टोइंग व्हॅनवर कोण कारवाई करणार? कराराचा भंग केलेल्या संबंधित कंपनीवर वाहतूक पोलीस कारवाई करणार हा? प्रश्न वाहन चालकांकडून उपस्थित होत आहे.