श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला माता वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. याशिवाय 20 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. कटरा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रातील ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. गोपाल दत्त यांनी सांगितले की, या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
दरम्यान, ही दुर्घटना कशी घडली, रात्री पावणे तीनच्या सुमारास मंदिराच्या परिसरात नेमकं काय घडलं, याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे २.४५ च्या सुमारास मंदिर परिसरामध्ये काही भाविकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर धक्काबुक्की झाली. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.’
तर तेथे उपस्थित दर्शनासाठी गेलेल्या गाझियाबादमधील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, माता वैष्णौदेवी मंदिर परिसरात काही भाविक दर्शन घेतल्यानंतर तिथेच थांबलेले असतात, त्यामुळे तिथे गर्दी झाली. गर्दी वाढल्यामुळे लोकांना बाहेर पडण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
दरम्यान, जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. गोपाल यांनी दिली आहे.