कोथरूडमध्ये डीपी रस्ता कामाचा एक “दगड’ही हलला नाही
कोथरूड – भुसारी कॉलनीतील एकलव्य अभियांत्रिकी महविद्यालयाजवळील प्रस्तावित डीपी रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन होऊन दोन वर्षे झाली. तरीही अपूर्ण अवस्थेत असलेल्या या रस्त्याचा एक खडाही हललेला नाही. त्यामुळे दररोज या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना “ऍडव्हेंचर’ करावे लागत आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मानसिकता अधिकाऱ्यांची नाही की, लोकप्रतिनिधींची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डीपी रस्ता साधारण 15 मीटर रूंद आणि चार किमी लांबीचा आहे. एकलव्य परिसर आणि भुसारी कॉलनी तसेच मुंबई-पुणे-सातारा-बंगलूर महामार्गाला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. परंतु, केवळ 10 ते 20 मिटरच्या रस्त्याचे काम न झाल्यामुळे हा रस्ता वापरता येत नाही. मोठमोठे खड्डे, दगड आणि फुफाटा उधळत असला तरी सोयीचा रस्ता म्हणून नाईलास्तव वाहन चावलकांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक रमेश उभे, पराग पासलकर तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामजिक न्याय विभाग शहर प्रमुख यांनीही हे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली असून वेळोवेळी निवेदन दिले आहे.
खड्डाही बुजला…
या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी विद्यमान आणि तत्कालीन आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थित भूमिपूजन झाले. त्यावेळी खोदलेला खड्डाही बुजुन गेला आहे. ज्या जागेतून हा रस्ता जातो ती खासगी मालकीची असून जागामालक आणि पालिका यांच्यात अधिग्रहण मोबदल्याबाबत चर्चा सुरू असताना उद्घाटनाचा देखावा कशासाठी? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी आता उपस्थित केला आहे. प्रशासन आणि जागा मालक यांच्यातील तिढा सुटलेला नाही.