पुणे, दि. 4 -सातारा, वारजे आणि वेदभवन परिसरातून कोथरूडकडे जाणारी वाहने वेदभवन येथील उड्डाणपुलाखालून जातात. हे अंतर केवळ दहा मीटरचे आहे. मात्र, आता हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल अडीच ते तीन किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे. त्यामध्ये वेळ, पेट्रोल खर्च तर होतच आहे. मात्र, मानसिक त्रासही सहन करावा लागणार आहे.
एनडीए चौकातील रस्ता रूंदीकरणाच्या कामामध्ये वेदभवन परिसरातील रस्त्यांचेही रूंदीकरण सुरू आहे. सध्या वेदभवन मंदिरासमोरील रस्त्याचे काम अपूर्ण असून, येथील उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. वेदभवनच्या रोडने कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वेदभवन परिसरातील नागरिकांसह सातारा, वारजेकडून कोथरूडला जाणारी वाहनेही याच मार्गे जातात. त्यामुळे सकाळ-सायंकाळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी कायम आहे.
मात्र, मागील दोन दिवसांपासून वेदभवनकडून कोथरूडकडे जाण्यास “नो एंट्री’चा फलक लावण्यात आला आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध लावलेले बॅरिगेट्सही काढ्ण्यात आले. त्यामुळे जायचे कसे असा प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर पडला आहे. मात्र, जो मार्ग उपलब्ध आहे. तो “काखेत कळसा आणि गावाला वळसा’ असा आहे. त्यामुळे नागरिकांकडून याचा विरोध होत असून, स्थानिक नागरिकांसाठी रस्ता खुला व्हावा अशी मागणी केली जात आहे.
असा आहे मार्ग…
वेदभवनकडून कोथरूडला जाण्यासाठी उड्डापुलाखालून जाता येते. हे अंतर केवळ दहा मीटर इतके आहे. मात्र, आता हा मार्ग बंद झाल्यावर वाहनचालकांना वेदभवन येथून एनडीए रोडने जाऊन गार्डन कोर्ट हॉटेल येथून यू-टर्न घ्यायचा. तेथून मुळशी रोडला गेल्यावर “एनएचएआय’ कार्यालय येथून पुन्हा यू-टर्न घेऊन चांदणी चौकात महामार्गावर यायचे आणि तेथून प्रथमेश इलाईटसमोरील रस्त्याने कोथरूडला यायचे. हे अंतर जवळपास अडीच ते तीन किलोमीटर इतके आहे.
रेटनिंग वॉल पुन्हा तोडण्याची वेळ
महामार्गावरील लेनची संख्या वाढविण्यासाठी वेदभवन परिसरातील रेटनिंग वॉल बांधण्यात आली. या कामाल दोन महिनेही झाले नाही, तेच पुन्हा ही वॉल तोडण्याची वेळ आली आहे. आता पुन्हा याठिकाणी मातीचा भराव टाकून रेटनिंग वॉल नव्याने बांधण्यात येणार असल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले.