पुणे – महापालिकेकडून प्रमुख चौकांमध्ये उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. आता विश्रांतवाडी चौक आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गावर घोरपडी गाव येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांच्या खर्चास महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
विश्रांतवाडी उड्डाणपुलासाठी सुमारे 62 कोटी रुपयांचा खर्च येणार असून घोरपडी रेल्वे पूलासाठी 47 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विश्रांतवाडी चौकात सायंकाळी 12 हजार वाहने प्रतीतास जातात. त्यामुळे या चौकात उड्डाणपूलाची मागणी होत होती. तसेच, घोरपडीत रेल्वे मार्गावरील फाटक वारंवार बंद करावे लागत असल्याने येथे मोठी वाहूतक कोंडी होते असल्याची बाब लक्षात घेत या दोन्ही पुलांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
दरम्यान, विश्रांतवाडी चौकात पूलासोबतच निओ मेट्रोची जागा सोडून हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. विश्रांतवाडी चौकासाठी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह माजी आमदार जगदिश मुळीक, माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांच्यासह माजी उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनीही महापालिका तसेच राज्य शासनाकडे मागणी केली होती. तर, घोरपडी गावातील उड्डाणपुलासाठी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता.
विश्रांतवाडीतील पूल…
विश्रांतवाडी चौकात आळंदी रस्ता ते विमानतळ रस्त्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूल असून त्याची लांबी 570 मीटर असणार आहे. तर आळंदी रस्त्यावरून पुण्याकडे जाण्यासाठी 300 मीटर तर आळंदी रस्त्याकडून विमानतळाकडे जाण्यासाठी 160 मीटर असे दोन ग्रेड सेपरेटर असणार आहेत. शिवाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांना चौकातून आळंदी रस्ता, धानोरी तसेच विमानतळाकडे जाण्यासाठी सध्या वापरता असलेला रस्ता कायम असणारा आहे. या चौकात सध्या असलेले दोन्ही पादचारी पूल काढून शहरात इतर ठिकाणी ते वापरण्यात येणार आहेत.
पुणे-मिरज मार्गावरही उड्डाणपूल
वानवडी, फातिमानगर तसेच कॅम्पमधून मुंढवा, केशवनगरकडे जाणारी वाहने घोरपडी गावातून जातात. मात्र, घोरपडीत रेल्वे मार्ग असून यावर 24 तासांत तब्बल 110 वेळा रेल्वे फाटक पडते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेत या मार्गावर उड्डाणपूल उभारला जात असून त्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोंडी कमी होणार असली तरी पुणे-मिरज मार्गावर बॉटल नेक होण्याची शक्यता असल्याने या मार्गावरही नवीन उड्डाणपूल उभारला जाणार आहे. यासाठी 47 कोटींचा खर्च अपेक्षित असून या पूलाचे काम डिसेंबरमध्ये सुरू केले जाणार आहे.