पुणे – राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. शनिवारी (दि. 12) झालेल्या लोकअदालतमध्ये 64 हजार 373 दावे निकाली काढण्यात आले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन केले होते.
त्यासाठी 125 पॅनेलची नेमणूक केली होती. त्या माध्यमातून विविध न्यायालयांत प्रलंबित 16 हजार 695 प्रकरणे, विशेष मोहीमेच्या माध्यमातून 17 हजार 714 प्रकरणे आणि दाखलपूर्व 29 हजार 964 प्रकरणे अशी एकूण 64 हजार 373 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून 98 कोटी 7 लाख रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रताप सावंत यांनी दिली.
लोकअदालतीत निकाली काढलेल्या प्रकरणांमध्ये तडजोडयोग्य फौजदारी व दिवाणी, धनादेश बाउन्स, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, कौटुंबिक वाद, कामगार वाद, भूसंपादन, नोकरी आणि महसूल विषयक प्रकरणे, विविध बॅंका, वित्तीय संस्था, दूरध्वनी व विद्युत विभाग, पुणे व पिंपरी महापालिका आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे प्रलंबित पाणीपट्टी, मिळकतकर आदी दाखल व दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता.
याशिवाय, मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमभंग प्रकरणात नागरिकांना ठोठावलेल्या दंडात्मक ई-चलनाचे लाखो दावेही निकाली काढण्यात आले. विशेष म्हणजे यावर्षी ग्राहक आयोगात चार वर्षांनंतर लोकअदालत झाली. त्यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दाखल 41 प्रकरणे निकाली काढण्यात आली.