पुणे – सरपंचांच्या मागण्यांमुळे अखेर प्रशासन लागले कामाला

मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना मांडण्यात आल्या होत्या व्यथा

पुणे – “आमच्या गावात पाण्याची नेहमीच टंचाई असते, त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.’ तसेच काही सरपंचांनी गावाजवळील पाण्याच्या पर्यायी व्यवस्थेची कल्पनादेखील मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादामध्ये दिली. मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर सरपंचांच्या मागण्यांमुळे जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासाठी सरपंचांच्या संवादांनंतर सतत उत्तरे मागितली जात आहेत, त्यासाठी उत्तरे देखील प्रशासनाने तयार केली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.13 मे रोजी ऑडिओ ब्रीज सिस्टमद्वारे पुणे जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाइलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरुर तालुक्‍यांमधील साधारण 41 सरपंचांनी या संवादामध्ये विविध मागण्या केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने सततच्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाधिक सरपंचांनी मागणी केली. यामधील प्रत्यक्षात या संवादांमुळे कामे होणे आवश्‍यक आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सतत पाठपुरवा केला जात असल्याने सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे तयार केली आहेत.

सरपंचांच्या मागण्यांवर उत्तरे तयार
बहुतांशी दुष्काळाशी संदर्भात मागण्या होत्या. त्या मागण्यांना उत्तरे आपल्याकडून तयार करून ते पुढे पाठवण्यात येणार आहेत. आपल्या विभागाच्या अंतर्गत असलेल्या सरपंचांच्या मागण्यांवर उत्तरे तयार केली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.