पुणे – टॅंकरचे रेकॉर्ड दोन दिवसांत मोडणार?

संख्या तब्बल 300 च्या वर जाण्याची भीती : पाण्याचे पर्यायी स्रोत शोधण्यास सुरुवात

पुणे – जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंन दिवस वाढत असून, पुढील तीन दिवसात मागील पाच वर्षातील सर्वाधिक टॅंकरचे रेकॉर्ड मोडणार हे निश्‍चित. तर 30 मेपर्यंत जिल्ह्यात 300 च्या वर टॅंकरची संख्या जाण्याची भीती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईची भीषणता पाहता प्रशसानाने अतापासूनच पाण्याचे पर्यायी स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात तब्बल 244 टॅंकरद्वारे 164 गावे, 1 हजार 191 वाड्या-वस्त्यांवरील 4 लाख 68 हजार नागरिकांची तहान भागविली जात आहे. दरम्यान, 2013-14 मध्ये अशीच परिस्थिती उद्‌भवली होती. त्यावेळी 250 टॅंकरद्वारे 174 गावे आणि 1 हजार 194 वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर आजपर्यंत कधीही 150 च्या वर टॅंकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नव्हती. 2017-2018 चांगला पाऊस झाल्यामुळे केवळ 87 टॅंकर जिल्ह्यात सुरू होते. मात्र, यंदा परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुरेशा पाणीसाठा झाला नाही. तर राज्य शासनाला पाण्याचे नियोजन करताच आले नाही, असा आरोपही विरोधकांकडून होत आहे.

पाणीटंचाईचा फटका जिल्ह्यातील 13 पैकी 12 तालुक्‍यांना बसत आहे. त्यामध्ये सर्वाधिक बारामती, आंबेगाव, शिरूर, पुरंदर, इंदापूर आणि खेड तालुक्‍यात टॅंकरची संख्या अधिक आहे. सध्या बारामती आणि इंदापूरमध्ये प्रत्येकी 39 टॅंकर सुरू आहेत. शिरूर येथे 29, पुरंदर आणि आंबेगाव येथे प्रत्येकी 27, दौंड येथे 24 तर जुन्नरमध्ये 21 टॅंकर सुरू आहेत. दुष्काळाचा चटका पाहता आणि हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाचा वर्तविलेला अंदाज पाहता दि.30 जूनपर्यंत जिल्ह्यात आणखी 60 ते 70 टॅंकर वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये बारामतीमध्ये 8, आंबेगाव 5, दौंड 9, शिरूर, 7, पुरंदर 9, जुन्नर 8, इंदापूर 6 यासह अन्य तालुक्‍यातही टॅंकर वाढण्याची शक्‍यता आहे.

फेऱ्याही वाढल्या
जिल्ह्यात टॅंकरची संख्या वाढत असताना फेऱ्याही वाढल्या आहेत. उपलब्ध टॅंकर आणि पाण्याचे स्रोत यामध्ये अनेक वेळ जात असल्यामुळे प्रस्तावित फेऱ्या पूर्ण करणे शक्‍य होत नाही. मात्र, जास्तीत जास्त फेऱ्या पूर्ण करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ठेकेदारांना सूचना दिल्या जात आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात दररोज 466 टॅंकरच्या फेऱ्या सुरू होत्या. आता तब्बल 636 फेऱ्या दररोज होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.